भंडारा - जिल्ह्यातील नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर हक्काची वर्गखोली आणि वसतिगृह मिळाले आहे. मोहाडी तालुक्याच्या पाचगाव येथे बांधण्यात आलेल्या या प्रशस्त इमारतीमध्ये बुधवारपासून विद्यार्थांचे शिक्षण सुरू झाले. ही इमारत आणि येथील सोयीसुविधा पाहून मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
2017 मध्ये पहिल्यांदा भंडारा जिल्ह्यात जकातदर शाळेच्या जुन्या इमारतीमध्ये नवोदय विद्यालय सुरू करण्यात आले होते. परंतु, येथील वसतिगृह आणि वर्गखोल्यांच्या दृष्टीने ही इमारत अतिशय अडचणीची होती. त्यानंतर त्या विद्यालयाचे स्थानांतर करून अल्पसंख्यांक विद्यार्थिनीच्या वस्तीगृहात पाठविण्यात आले. मात्र, याला पालकांनी विरोध केल्याने हे विद्यालय मोहाडी तालुक्यातील महिला विकास महामंडळाच्या इमारतीमध्ये नेण्यात आले. या इमारतीमध्येही विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी येथे खाटा उपलब्ध नव्हते, हिवाळ्यात आंघोळीसाठी गरम पाणी नव्हते. तरीही या विद्यार्थ्यांनी हार न मानता या विद्यालयात आपले स्वतःचे शिक्षण सुरू ठेवले. अखेर त्यांचा संघर्ष संपला आणि बुधवारपासून या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण हे पाचगाव स्थित नव्याने बनलेल्या नवोदय विद्यालयाच्या स्वतःच्या अद्यावत इमारतीमध्ये सुरू झाले आहे.
मोहाडी तालुक्यातील पाचगाव येथे २२ एकरात २० कोटी रुपये खर्च करून प्रशस्त इमारत आणि परिसराची उभारणी करण्यात आली आहे. या परिसरात १८ अद्यावत वर्गखोल्या, ३ प्रयोगशाळा, ४० विद्यार्थी एकत्र शिकू शकतील एवढा मोठा संगणक वर्ग, मोठे वाचनालय, स्टाफ रूम, मेडिकल रूम, काउन्सिलिंग वर्ग, पेंटिंग वर्गखोली आणि म्युझिकल वर्गखोलीची उभारणी केली गेली आहे. सोबतच ५०० विद्यार्थी एकत्र जेवण करतील एवढी मोठी खानावळ आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण अशा वेगवेगळे वस्तीगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. मुलांचा शारीरिकदृष्ट्या विकास व्हावा यासाठी रनिंग ट्रॅक, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल खेळ खेळण्यासाठी मोठी मैदान तयार करण्यात आले आहेत. एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाच्या दृष्टीने सर्व सुविधायुक्त इमारत आणि परिसर येथे निर्माण केला गेला आहे.
हेही वाचा - हरणाची शिकार करून मांस खाणाऱ्या पाच लोकांना अटक
विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत ज्या इमारतींमध्ये शिक्षण घेतले त्यात त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. त्यामुळे आजपासून स्वतःच्या हक्काची आणि प्रशस्त इमारत आणि परिसर मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हाच एकमेव उद्देश नवोदय विद्यालयाचा आहे. त्यादृष्टीने सर्व शिक्षकगण नेहमीच प्रयत्नशील असतात. अशा सुविधांमुळे विद्यार्थी नक्कीच देशात स्वतःचे नाव लौकिक करतील असा विश्वास असल्याचे नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक सम्राट टेम्भुर्णीकर यांनी म्हटले.
हेही वाचा - भंडारा जिल्ह्यातील 'त्या' दोन पोलीस निरीक्षकांवर अखेर निलंबनाची कारवाई