भंडारा - जिल्ह्यातील दोन पोलीस निरीक्षकांना पोलीस महानिरीक्षकांनी निलंबनाचे आदेश पाठवताच, जिल्ह्यातील पोलीस विभागात चांगलीच धडकी भरली आहे. भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण आणि साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोड यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा...'दिल्लीत नव्या राजकारणाला सुरूवात'; केजरीवालांनी नागरिकांचे मानले आभार
भंडारा पोलीस स्टेशन...
1 फेब्रुवारीला भंडारा येथील मराठी पत्रकार संघात सुरु असलेल्या ख्रिश्चन धर्माच्या कार्यक्रमात काही आंदोलनकर्त्यांनी पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांच्यासह प्रवेश केला आणि तो कार्यक्रम बंद पाडला. ख्रिश्चन लोक गरीब लोकांना धर्माची भीती आणि पैशाचे आमिष दाखवून त्यांचे धर्म परिवर्तन करीत आहेत, असा आरोप या आंदोलनकर्त्यांचा होता. तशी तक्रार आंदोलनकर्त्यांनी भंडारा पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. मात्र, राजकीय दबावातून आंदोलनकर्त्यांवरच नंतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणातील आंदोलक, हे पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी गेले होते. आंदोलनकर्त्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा कसा दाखल करण्यात आला ? जर हे आंदोलक दोषी आहेत, तर मग पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी हे सुद्धा आरोपी आहेत आणि त्यांच्यावर देखील कार्यवाही व्हावी, अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली होती. शेवटी पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशाने सुधाकर चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.
हेही वाचा... लहान भावाचा सांभाळ की शिक्षण ? रेश्माने निवडला 'हा' पर्याय
साकोली पोलीस स्टेशन...
साकोली येथे एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणात तपासात निष्काळजी केल्याच्या आरोपावरून दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साबळे यांनी अगोदरच निलंबन केले होते. याच प्रकरणात साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांचेही निलंबन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यांच्या निलंबनानंतर पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांनी साकोली पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारला आहे.
दरम्यान, एकाच दिवशी दोन पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याचा आदेश पोहोचताच संपूर्ण पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.