भंडारा - नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांनी आता प्लाझ्मा दानासाठी देखील पुढाकार घेतला आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्माची आवश्यकता असते. पोलिसांनी प्लाझ्मा दान करून सामाजिक भान जपले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित प्लाझ्मा दान शिबिरात पोलिसांनी प्लाझ्मा दान केला.
लॉकडाऊनमध्ये सेवा दिली आता जीव वाचवणार
टाळेबंदीच्या काळात पोलीस विभागाने अतिशय जोखमीचे कर्तव्य बजावले. त्यामुळेच भंडारा जिल्ह्यातील अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर मात केली. कोरोनावर मात केलेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा हा कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी उपयोगी ठरतो. त्यामुळे या पोलिसांनी प्लाझ्मा देण्याचा निर्णय घेतला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद
कोरोनावर मात केलेल्या पोलिसांनी प्लाझ्मा दान करावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल 51 पोलिसांनी प्लाम्झा दान केला. यामध्ये महिला पोलिसांचा देखील सहभाग होता. जिल्हा प्रशासनाने प्लाझ्मा दान करणाऱ्या पोलिसांचे आभार मानले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडून शिबिराचे आयोजन
कोरोनाबाधित व्यक्तीवरील उपचारासाठी प्लाम्झाची आवश्यकता असते, त्यामुळे भंडाऱ्यात जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या संकल्पनेतून प्लाम्झा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि लाईफ लाईन रक्तपेढी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवस भंडाऱ्यात हे शिबीर आयोजीत करण्यात आले. यामध्ये 78 व्यक्तींनी प्लाम्झा दान केला. प्लाम्झा दात्यांमध्ये सर्वाधिक पोलिसांचा समावेश होता.