भंडारा - जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून चार लोकांवर अमानुष मारहाण करून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वेळेत पोलीस पोहोचल्यामुळे एक मोठी घटना टळली आहे. या चारही लोकांना उपचारासाठी तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असून पोलिसांनी काही आरोपींना अटक केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजापूर हमेशा या गावात रात्री दीड वाजेच्या सुमारास गावातील जवळपास वीस-पंचवीस लोकांच्या टोळीने त्याच गावातील चार लोकांना विवस्त्र करून अमानुष मारहाण केली आहे. तसेच त्यांच्या अंगावर पेट्रोल घालून जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला. मात्र, गावातील कुणीतरी पोलिसांना फोन करून या घटनेविषयी माहिती दिल्यामुळे पोलीस योग्यवेळी घटनास्थळी पोहोचल्याने या चार लोकांचा जीव वाचला.
गावातील एका महिलेच्या अंगात आले आणि ती गावातील वेगवेगळ्या लोकांच्या घरी जायला लागली. तिच्या मागोमाग तिच्या कुटुंबातील लोक आणि इतर गावकरीही जात होते. ती बाई ज्या लोकांच्या घरी गेली त्या सर्व चारही लोकांना या वीस पंचवीस लोकांनी विवस्त्र करून अमानुष मारहाण केली. त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ज्या लोकांना मारहाण केली गेली त्यामध्ये कुंदन गौपले, ओमप्रकाश मेश्राम, मनोहर थोटे आणि कचरू राऊत या चौघांचा समावेश आहे. पोलिसांनी योग्य वेळेत घटनेवर पोहोचून या चारही लोकांना सुरक्षित आपल्या गाडीत बसवून त्यांना उपचारासाठी तुमसर येथील रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक, उपपोलीस अधीक्षकांनी तपास सुरू केला आहे. गावात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे.