बीड - शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागात मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे. अनेकवेळा रस्ता दुरुस्तीची मागणी करून देखील बीड नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याने शनिवारी बीड शहरात महिला भाजपच्यावतीने 'डबके आंदोलन' करण्यात आले. यावेळी महिलांनी चक्क डबक्यातील पाण्यात बसून नगरपालिका विरोधात घोषणाबाजी केली.
बीड नगरपालिकेकडून शहरातील नागरिकांच्या मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण असल्याचा आरोप महिला भाजप आघाडीच्या अॅड संगीता धसे यांनी केला आहे.
बीड शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते चिखलमय झाले आहेत. अनेक नागरिकांचा खराब रस्त्यामुळे अपघात झालेला आहे. नगरपालिका बीड शहरातील रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे. याचा त्रास सर्वसामान्य बीडकर यांना होत आहे.
एकंदरीत नगरपालिकेच्या या गलथान कारभाराविरोधात आम्ही रस्त्यावरील डबक्यामधील पाण्यात बसून नगरपालिकेच्या गलथान कारभाराचा निषेध करत असल्याचेही भाजप महिला आघाडीच्या सदस्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी घोषणाबाजीने मोंढा रोड दणाणून गेला होता.