बीड - मागील पाच वर्षांपासून सातत्याने मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाण्याअभावी फलोत्पादनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. येणाऱ्या काळात मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा हटवून फलोत्पादनाचा बॅकलॉग पूर्ण करण्यात येईल, असे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज येथे सांगितले. मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच रविवारी दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर बीड येथे आले होते.
दुष्काळ निवारणासाठी, केंद्र व राज्य सरकारची मिळून पश्चिमी भागातील नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी एकत्रित करण्याची आणि ते पाणी मराठवाड्यासाठी वापरण्याची योजना आहे. यामधून 135 टीएमसी पाणी गोदावरी, सिंदफणा मांजरा, खोऱ्यात आणण्याचा विस्तृत आराखडा तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव प्रकल्पाला भेट देऊन पाणी साठ्याची पाहणी केली. यावेळी डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे यांची उपस्थिती होती.
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, दुष्काळ हा भूतकाळ ठरावा अशा पद्धतीने केंद्र व राज्य सरकार काम करत आहे. येणाऱ्या पिढीला कधीच दुष्काळ जाणवू नये, अशा पद्धतीने सरकार सिंचनाचे काम करत आहे. अप्पर वैतरणा, मुळा धरण, नांदूर मधमेश्वर, जायकवाडी प्रकल्पावरील वॉटर हार्वेस्टिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. अधिक क्षमतेच्या सिंचन व्यवस्थेमुळे येणाऱ्या काळात फलोत्पादन क्षेत्र देखील वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच जयदत्त क्षीरसागर बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पानंद रस्त्याच्या कामाला गती देणार असल्याचेही सांगितले. यासाठी गावच्या समितीमार्फत काम सुरू करण्यावर करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे असे ते म्हणाले. यावेळी वडवणी तालुक्यातील काडीवडगाव येथे फलोत्पादन परिसंवाद झाला. यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.