बीड - चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने पत्नीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करून अर्धा भाग फ्रिजमध्ये, तर अर्धा जाळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 9 दिवसांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणाचा पोलिसांनी 4 तासात लावला आहे.
हेही वाचा - मराठा समाजासाठी काम करणाऱ्या 'सारथी' संस्थेला जाणीवपूर्वक स्थगिती - विनायक मेटे
संजय साळवे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रेश्मा संजय साळवे (30, रा. अशोकनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. रेश्माचा संजय साळवेसोबत 13 वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. लग्नानंतर संजयने पत्नीचा धर्म स्वीकारुन संजय उर्फ अब्दुल रहेमान हे नाव धारण केले होते. त्यांना 1 मुलगा आणि 1 मुलगी 2 अपत्ये आहेत. संजय हा काही कामधंदा करत नसल्यामुळे रेश्मा व संजयमध्ये खटके उडत होते. रेश्मा बचत गटाचे तसेच महिलांची शासकीय कार्यालयातील कामे करत असे. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संजय हा पत्नी रेश्माच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दरम्यान, 26 नोव्हेंबरला संजयने रेश्माचा मोबाईल गहाण ठेवला. त्यावरुन रेश्मा व संजयचे कडाक्याचे भांडण झाले. यावरून पत्नीला कायमची अद्दल घडवण्यासाठी संजयने 30 नोव्हेंबरला खूनाचा कट रचला. त्या रात्री जेवण करुन सगळे झोपी गेल्यानंतर संजयने पत्नीच्या डोक्यात घाव घातला. त्यानंतर गळा आवळून तिचा खून केला.
हेही वाचा - परळीत महाविकास आघाडीचा राज्यातील पहिला विजय; धनंजय मुंडें गटाने सिरसाळा ग्रा. प. निवडणूकीत मारली बाजी
प्रेत जाळण्याचा फसला प्रयत्न-
दोन्ही मुले झोपेतून जागे होण्याआधी पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संजयने घरातील पाण्याच्या रिकाम्या टाकीत मृतदेह टाकला. पेट्रोल ओतून हे मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह जळाला नाही. त्यामुळे त्याने मृतदेह पुन्हा टाकीबाहेर काढला आणि त्याचे तुकडे केले. तुकडे केलेले शरीराचे अवयव त्याने घरातील फ्रीजमध्ये ठेवून तो लॉक केला.
मुलांना दमदाटी
सकाळी मुले झोपेतून जागी होण्यापूर्वी संजयने घरातील रक्त धुवून टाकले. त्यानंतर मुलांना 'कोणी काही विचारले तर काही बोलू नका, आई गावी गेली आहे, असे सांगा'असे बजावले. त्यानंतर तो मुलांना 24 तास सोबत घेऊन फिरत होता.
मृतदेहाचा अर्धा भाग नेला नदीवर-
पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये किती दिवस ठेवायचे? असा प्रश्न संजयसमोर होता. त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने शरीराचे तुकडे नदीवर नेऊन ते जाळून पुरावा कायमचा नष्ट करण्याचे नियोजन केले. त्यानुसार सोमवारी सकाळी 6 वाजता पत्नीच्या मृतदेहाचे अवयव त्याने बादलीत भरले. त्यावर कापड टाकून दोन्ही मुलांसह तो इंदिरानगर भागातील भीमटेकडी परिसरात पोहोचला. मुलांना दूर उभे करुन झुडूपात जाऊन शेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर ते अवयव फेकले आणि सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल ओतून ते पेटवून दिले. त्यानंतर तो मुलांसह घरी परतला.
असा झाला उलगडा-
सोमवारी इंदिरानगर भागातील भीमटेकडी परिसरात अर्धवट जळालेला मानवी शरीराचे अवयव स्थानिकांना आढळल्याने सकाळी खळबळ उडाली. निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मात्र, केवळ कंबरेवरील भाग असल्याने मृताची ओळख पटवणे अवघड होते. मात्र, हा प्रकार खूनाचा असावा या शंकेला वाव होता. या परिसरातील कोणी बेपत्ता आहे का? याची माहिती घेतली तेव्हा रेश्मा 8 दिवसांपासून कोणाला दिसली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
त्यानंतर पोलीस संजय साळवेच्या घरी पोहोचले. तेव्हा घराला कुलूप होते. त्यानंतर जुन्या बसस्थानक परिसरात संजय 2 मुलांसह पोलिसांना मिळाला. त्यावेळी त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. अवघ्या 4 तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.
या घटनेचा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाण्याचे निरीक्षक सय्यद सुलेमान, गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत यांनी तपास केला.