बीड - एखाद्या चित्रपटात शोभावी अशी घटना बीड जिल्ह्यात प्रत्यक्षात घडली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील मच्छिंद्र शिंदे यांचा चार वर्षांपूर्वी परभणी येथून हरवलेला मुलगा आधार लिंकमुळे सापडला आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबीयांचा मुलगा सापडल्याचा आनंद गगनात मावत नव्हता.
या बाबत सविस्तर माहिती अशी, बीड जिल्ह्यातील मच्छिंद्र शिंदे चार वर्षांपूर्वी परभणीला मुलासह गेले असता त्यांचा भीमराव नावाचा मुलगा हरवला खूप दिवस शोधूनही तो सापडला नाही. परभणी जिल्ह्यातील काही समाजसेवकांना तो मुलगा मिळून आला, त्यांनी समाज कल्याण समिती समोर त्या मुलाला आणले. त्यानंतर त्या मुलाची रवानगी तुळजापूर येथील 'आपलं घर' या अनाथाश्रमात करण्यात आली. तिथे भीमरावचे मूळचे नाव कोणालाच माहीत नव्हते, त्यामुळे त्याचे हनुमान घाडगे असे नाव 'आपलं घर' परिवाराच्या वतीने ठेवण्यात आले. अलीकडच्या काही दिवसांमध्ये हनुमान घाडगे म्हणजेच मूळ भीमराव शिंदे याचे आधार कार्ड काढण्याचे काम आपले घर आश्रमाच्या माध्यमातून सुरू झाले. मात्र, हनुमान घाडगे याचे पूर्वीचे आधार कार्ड काढलेले असल्यामुळे नवीन आधार कार्ड निघत नव्हते. यावरून हनुमान घाडगे उर्फ भीमराव शिंदे याचे पूर्वीचे नाव मुंबई येथील आधार केंद्रात मिळाले. त्याच्या घराचा पत्ता देखील मिळाला आणि हनुमान घाडगे हा पुन्हा भीमराव मच्छिंद्र शिंदे झाला. 'आपलं घर' या तुळजापूर येथील संस्थेने माजलगाव येथील मच्छिंद्र शिंदे यांना शोधून कार्ड व त्यांचा चार वर्षांपूर्वी हरवलेला भीमराव त्यांना परत केला. चार वर्षानंतर आपला मुलगा पुन्हा आपल्याला मिळाला असल्याचा आनंद शिंदे कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर झळकत होता. आधार लिंकमुळे शिंदे कुटुंबीयांच्या घरात पुन्हा चार वर्षानंतर आनंदी वातावरण निर्माण झाले असल्याचे भीमरावचे वडील मच्छिंद्र शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा - बीडमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न
चार वर्षांपूर्वी माजलगाव येथून भीमराव मच्छिंद्र शिंदे ऊर्फ हनुमान घाडगे (नावात झालेला बदल) हा मुलगा हरवला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग जवळील अलियाबाद येथील "आपलं घर" या बाल आधार गृहाने त्याला आधार दिला. या ठिकाणचे अधीक्षक नरेश ठाकूर यांनी या मुलाचे नवीन आधार कार्ड काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, वेळोवेळी काही त्रुटी आढळल्यामुळे ठाकूर यांनी याचा पाठपुरावा केला आणि भीमराव ऊर्फ हनुमान याला मुंबई येथील आधार कार्ड कार्यालयात घेऊन गेले आणि याची चौकशी केली. तेव्हा हनुमानचे आधार कार्ड पूर्वीच काढलेले आहे, असे समजले. पूर्वीचे आधार कार्ड मिळाले. त्या आधार कार्डवर सर्व माहिती मिळाल्याने त्याचे आई-वडील असल्याचा शोध लागला. लगेच माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथील हा मुलगा असल्याची माहिती मिळाली. तेथील सामाजिक कार्यकर्त्या अॅड. सुलभा देशमुख यांनी मोठेवाडी परिसरात त्याच्या आई-वडिलांची विचारपूस केली असता तपास लागला. आधार कार्ड मिळाल्यामुळे अवघ्या 16 तासात भीमराव ऊर्फ हनुमानाला आपले आई-वडील मिळाले. यामुळे आधारने निराधार हनुमानला आधार देत कायम स्वरूपी आधारवड देणारे हरवलेले आई वडील मिळवून दिले आहेत.
हेही वाचा - कौतुकास्पद : 'या' विद्यालयाने विद्यार्थ्यांना दिलेली 'शपथ' पाहून तुम्हालाही होईल आनंद !