बीड - जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्यासाठी दसरा मेळावा विशेष आहे. पंकजा मुंडे दरवर्षीप्रमाणे यावेळीही भगवान भक्तीगडावर म्हणजेच संत भगवान बाबा यांची जन्मभूमी सावरगावात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. मंगळवारी 8 ऑक्टोबरला होणाऱ्या या मेळाव्याला भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असेल. 2014 लाही विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अमित शाह यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकाळात भगवान गड ओबीसी राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असे, आता हे स्थान भगवान भक्ती गड होईल का, हे पहावे लागणार आहे...
हेही वाचा... 'मॉब लिंचींग' आपली संस्कृती नाही; हा शब्द पाश्चिमात्यांच्या धर्मग्रंथात - मोहन भागवत
काय आहे भगवान भक्ती गड ?
सावरगाव घाट (ता. पाटोदा ) हे संत भगवान बाबांचे जन्मस्थान आहे. नगर जिल्ह्यातील भगवानगडाची स्थापना करणारे संत भगवानबाबा हे मूळचे सावरगाव घाट येथील. या ठिकाणी भगवान बाबांचे घर देखील आहे. तसेच भगवानबाबांचे मंदिर बांधण्यात आले आहे.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांनी भगवान गडावरून दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. राज्यभरातून लोक या मेळाव्याला उपस्थित रहायचे. या मेळाव्यासाठी देशातील आणि राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. गोपीनाथ मुंडे भगवानगडावरुन दिल्लीचा वेध घ्यायचे. मात्र, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी यापुढे गडावर राजकीय भाषण होणार नाही, अशी घोषणा केली. यानंतर भगवान गडाची लेक म्हटल्या गेलेल्या पंकजा मुंडे समर्थक आणि नामदेव शास्त्री समर्थकांमध्ये दोन वर्षे वाद धुमसत होता. यानंतर पंकजा मुंडेंनी एक दसरा मेळावा भगवानगडाच्या पायथ्याशी घेतला होता.
हेही वाचा... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला हजेरी
यानंतर मात्र वाद वाढवायला नको, म्हणून सावरगाव घाटच्या ग्रामस्थांनी मंत्री पंकजा मुंडेंना भगवान बाबांच्या जन्मस्थळी येण्याचे निमंत्रण दिले आणि तीन वर्षांपूर्वी सावरगाव घाटला 'भगवान भक्ती गड' हे नाव देण्यात आले. 'मी भगवान गडावरून भगवान बाबांना घेऊन आलेय, आता भक्ती इथे आहे', अशी घोषणा करत पंकजा मुंडेंनी येथे दसरा मेळाव्याची सुरुवात केली. मंगळवारी 'भगवान भक्ती गडा'वर तिसरा दसरा मेळावा होत आहे. यासाठी स्वतः अमित शाह उपस्थित राहत आहेत. जसे दिवंगत गोपीनाथ मुंडे देश आणि राज्यातील दिग्गजांना आपल्या भक्तांची शक्ती दाखवून दिल्ली आणि मुंबईच्या राजकारणाचा वेध घ्यायचे, तोच कित्ता आता भगवान भक्ती गडावरून मंत्री पंकजा मुंडे गिरवत आहेत.
हेही वाचा... मराठा क्रांती मोर्चा आणि शिव प्रहारच्या प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
जेसीबीतून आणलेल्या फुलांची प्रितम मुंडे यांच्यावर उधळण
मंगळवारी सकाळी परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथून निघालेल्या रॅलीचे सारथ्य खासदार प्रीतम मुंडे यांनी केले. यावेळी परळी ते सावरगाव घाट दरम्यान ठीक-ठिकाणी प्रीतम मुंडेंचे जोरदार स्वागत झाले. एक ठिकाणी जेसीबीतून आणलेल्या फुलांची प्रितम मुंडे यांच्यावर उधळण करण्यात आली.