बीड : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे या आत्महत्येमुळे संसार उध्वस्त झाल्याचे आपण अनेकवेळा पाहिले आहे. विशेष म्हणजे, बीड जिल्ह्यामध्ये नैसर्गिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे काही भाग अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असल्याने या भागातील शेतकरी अनेकवेळा अडचणीत सापडतो. आपण पाहतो की, अनेकवेळा अतिवृष्टी होते हाता-तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातात न लागता निसर्ग घेऊन जातो.
पालकमंत्री अपेक्षा पूर्ण करतील : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे झालेले आहेत. आतापर्यंत आपल्या जिल्ह्याकडे मंत्र्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे आता आमच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. विशेष म्हणजे, एक सोयाबीन बॅग घ्यायची म्हटले तर साडेतीन हजार रुपये लागतात. एक खताची गोणी घ्यायची म्हटलं तर तेराशे रुपये लागतात. एक एकर क्षेत्र पेरायला एक हजार रुपये ट्रॅक्टर घेतो. एवढा खर्च करूनही निसर्ग साथ देत नाही. आता पेरणी झाली मात्र पावसाने हात आकडता घेतल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. काय असाच प्रश्न आमच्यापुढे आहे. बीड जिल्ह्याला पिक विमा आणि अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही. यामुळे आम्हाला वाटत आहे की, आता कृषी मंत्री हे आमचे झालेले आहेत आणि ह्या आमच्या अपेक्षा पूर्ण करतील असं आम्हाला वाटत आहे, असे मत शेतकरी बाबुराव कदम यांनी मांडले.
शेतमालाला हमीभाव द्यावा: आमच्या जिल्ह्याचे कृषिमंत्री हे धनंजय मुंडे झालेले आहेत आणि आमच्याही अपेक्षा आहेत की आमच्या मालाला हमीभाव दिला जावा. आम्ही आता खत बी बियाणे पेरलं आहे आणि ते उगवलं देखील आहे. काही भागात पेरण्या झालेल्या नाहीत. त्या भागात पावसाची आवश्यकता आहे. आमची एवढीच अपेक्षा आहे की, आम्हाला आमच्या मालाला हमीभाव द्यावा, असे विचार बाबा बहिरवाळ या शेतकऱ्याने मांडले.
वेळेवर पीकविमा व नुकसान भरपाई मिळावी: पाऊस पडायला एक महिना उशीर झाला. तूर, मूग, कापूस, उडीद ही पीकं मग कशी येणार? खत, बी पेरलयं पण आता पावसाची आवश्यकता आहे. रोज ढग येतात, आम्ही वर आकाशाकडे पाहतो. मात्र, पाऊस पडत नाही. आज येईल, उद्या येईल अशी पावसाची आम्ही वाट पाहत आहोत. पावसाअभावी पेरलेल्या पिकाचं कस् व्हायचं? हा मोठा प्रश्न आहे. मागच्या वर्षीचा पिक विमा भेटला नाही. नुकसान भरपाई भेटली नाही. आता बीड जिल्ह्याचे धनंजय मुंडे हे कृषी मंत्री झाले आहेत. आता त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत की, ते आम्हाला वेळेवर पिक विमा आणि नुकसान भरपाई देतील आणि आमच्या मालाला हमीभाव देतील, अशी आर्त भावना महिला शेतकरी राजुबाई खंडू कोटूळे यांनी व्यक्त केली.
तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील: धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषिमंत्री झालेत, याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. मात्र आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. वेळेवर आम्हाला पीकविमा द्यावा. त्याचबरोबर आमच्या मालाला भाव द्यावा आणि बीड जिल्ह्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात. याच्यासाठी धनंजय मुंडे यांनी प्रयत्न करावेत. असे केल्यास नक्कीच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असे विचार शेतकरी खंडू कोटूळे यांनी मांडले.
हेही वाचा: