बीड - राज्यातील वंजारी समाजाला 10 टक्के आरक्षण द्या, ही प्रमुख मागणी घेऊन वंजारी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला. यावेळी राज्यभरातून हजारो वंजारी बांधव बीडमध्ये दाखल झाले होते. मोर्चात महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. आरक्षणाबाबत पंकजा आणि धनंजय मुंडेंनी कधीच आवाज उठवला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी 'एकच मिशन, वंजारी आरक्षण' यासह गोपीनाथ मुंडेंच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पंकजा आणि धनंजय मुंडेंनी कधीच आवाज उठवला नाही
गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात मुंडे कुटुंबीय आहे. मात्र, समाजाला आरक्षणाची गरज आहे, ही मागणी पंकजा आणि धनंजय मुंडेनी कधीच लावून धरली नसल्याची प्रतिक्रिया मोर्चात सहभागी झालेल्या मुलींनी दिली. या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही. हा जनतेच्या मनातील आक्रोश असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
वंजारी समाजातील ५ महाविद्यालयीन मुलींच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आजही वंजारी समाज विकासापासून दूर आहे. शेती आणि मजुरी याशिवाय अनेक वर्षांपासून ऊस तोडणीचे काम हा समाज करत आलेला आहे. समाजाला केवळ 2 टक्के आरक्षण आहे. सामाजाची लोकसंख्या लक्षात घेऊन सरकारने 10 टक्के आरक्षण द्यावे. हा समाज आजही वाडी-वस्तीवर राहतो. मागास असलेल्या वंजारी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 10 टक्के आरक्षण मिळणे आवश्यक आहे. सरकारने जातनिहाय जनगणना करावी, उद्योग व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, जिल्हानिहाय वसतिगृह व्हावेत, समाजाच्या उन्नतीसाठी गोपीनाथराव मुंडे या नावाने महामंडळ स्थापन करावे, यासह विविध मागण्या वंजारी समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने करण्यात आल्या. या मोर्चाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.