बीड - पक्ष व संघटनांचे जोडे बाजूला ठेवून राज्यभरातील वंजारी समाज दहा टक्के आरक्षण मागणीसाठी एकत्र आला आहे. आरक्षण मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे देणार असून यावर आमचा प्रश्न मार्गी लागला नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर वंजारी समाज बहिष्कार टाकणार आहे, अशी माहिती जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर सबंध राज्यातील वंजारी समाज पोरका झाला आहे असेही ते म्हणाले.
बीड येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी युवा नेते प्रा. शिवराज बांगर, महासंघाचे जिल्हाध्यक्ष बप्पासाहेब घुगे यांची उपस्थिती होती. वंजारी समाजाचा एनटी-डी प्रवर्गातून ओबीसी प्रवर्गात समावेश करावा अथवा 10 टक्के वाढीव आरक्षण द्यावे. याशिवाय, नोकर भरतीतील जागांबाबत होत असलेल्या अन्यायाविरोधात येत्या काळात लढा देणार असल्याची भूमिकाही जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी स्पष्ट केली. सरकारने २ महिन्यात प्रश्न मार्गी न लावल्यास आगामी विधानसभा निवडणूकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
पुढे बोलताना बाळासाहेब सानप म्हणाले, गेल्या पाच वर्षात वंजारी समाजाच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले असल्यामुळे समाजातील वंचित लोकांमध्ये सरकारप्रती तीव्र नाराजी पसरली आहे. समाजबांधवांच्या आग्रहाखातर यापुढे पुन्हा एकदा आरक्षणाबाबत लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील वंजारी समाजाची वाढती लोकसंख्या पाहता एनटी-डी प्रवर्गातून ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात यावा. अथवा, ८ टक्के वाढीव आरक्षण दिल्यास समाजातील ऊसतोड कामगार, मजूर व कामगारांचे जीवनमान उंचावेल. सध्या होत असलेल्या नोकर भरतीतही शासनाकडून एनटी-डी प्रवर्गासाठी अडीच टक्क्याहून कमी जागा आरक्षित करुन अन्याय केला जात आहे. त्यामुळे सरकारने आरक्षणासह नोकर भरतीतील अन्यायाबाबत येत्या दोन महिन्यात निर्णय न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे.
या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बीड येथे ११ आॅगस्टला बैठक घेणार असून या बैठकीस समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी सानप यांनी केले. यावेळी बोलताना प्रा.शिवराज बांगर यांनी सांगितले की, या आठवड्यात राज्यभरात जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन मतदानावर समाजबांधव बहिष्कार टाकणार असल्याचे सरकारला कळविण्यात येईल. निवडणूकीत बहिष्कार टाकल्यास राज्यातील ४७ विधानसभा मतदारसंघात सरकारला फटका बसू शकतो असेही ते म्हणाले.