बीड - शहरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना वंचितचे उमेदवार अशोक हिंगे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. भाजप सरकारच्या काळात समाजातील वंचित घटकाच्या वाट्याला कायम उपेक्षाच आली आहे. विकासाच्या नावाने सर्वत्र बोंबाबोंब आहे. आता जनता सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास हिंगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. तसेच बीड विधानसभा मतदारसंघात माझी लढत ही थेट महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबतच असणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा... 'दोन्ही पैलवान तोलामोलाचे असल्याशिवाय कुस्तीत मजा येत नाही'
बीड जिल्ह्यातील बीड, माजलगाव व गेवराई विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी बीड शहरात प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा होत आहे. याची माहिती अशोक हिंगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
हेही वाचा... 'कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र?'
अशोक हिंगे पुढे म्हणाले की, भाजप सरकारने कायम जातीपातीचे राजकारण करून समाजातील दुर्बल घटकाला विकासापासून दूर लोटले आहे. मात्र आम्ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटीबद्ध आहोत. बीड जिल्ह्यातील जनतेने आमच्या पाठीशी उभे राहावे, असे आव्हानही हिंगेंनी केले. यावेळी गेवराई विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विष्णू देवकते यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.