बीड - माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय तथा वैद्यनाथ अर्बन बँकेचे चेअरमन अशोक जैन यास दहा लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी केली. वैद्यनाथ अर्बन बँकचे चेअरमन अशोक पन्नालाल जैन असे लाच स्वीकारणार्या आरोपीचे नाव आहे.
जैन याने तक्रारदारास सीसी अकाउंटचे अडीच कोटी रुपये कर्ज मंजूर केल्याचा मोबदला म्हणून 15 लाखाची मागणी केली. त्यानंतर तडजोड करुन दहा लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, सापळा अधिकारी पोनि.गणेश धोक्रट, पोना. विजय बाम्हंदे, सुनील पाटील, मिलिंद इप्पर, पोशि. विलास चव्हाण, चागंदेव बागुल यांनी केली. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
लाचखोरीच्या घटनेत आतापर्यंत अधिकारी सापडायचे, मात्र भाजपा खासदार प्रीतम मुंडे संचालक असलेल्या वैद्यनाथ बँकेच्या अध्यक्षालाच कर्ज मंजुरीसाठी तब्बल दहा लाखाची लाच घेताना पकडण्यात आले आहे. अशोक जैन हे वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष असून एका कर्जदाराला दीड कोटीचे कर्ज मंजुर करण्यासाठी त्यांनी १५ लाखाची लाच मागितली होती. त्यातील दहा लाख रुपये घेताना एसीबीच्या पथकाने जैन यांना पकडले. यामुळे राज्यात खळबळ माजली आहे.
पंकजा मुंडे यांच्या प्रतिष्ठेला धक्का -
अशोक जैन हे गेल्या अनेक वर्षापासून वैद्यनाथ अर्बन बँकेचे चेअरमन आहेत. याबरोबरच माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे अत्यंत विश्वासू व जवळचे कार्यकर्ते आहेत. मात्र, सोमवारी या प्रकारामुळे नावाजलेल्या वैद्यनाथ बँकेची बदनामी झाली आहे. याबरोबरच राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रतिष्ठेला देखील धक्का लागला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा होत आहे.