परळी वैजनाथ (बीड) - शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या नागरी आरोग्य केंद्रात कोविड 19 लसीकरण केंद्र सुरू करून या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय दुर करावी, अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी पाठपुरावा केल्यानंतर आरोग्य विभागाकडून आज या नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी निळकंठ चाटे यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत करून लसीकरण सुनियोजितपणे राबवावे, अशी सूचना केली.
हेही वाचा - परळीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका, 5 लाखाचा दंड वसूल
परळी शहरातील नागरिकांसाठी सावतामाळी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, नटराज रंग मंदिर व थर्मल कॉलनी दवाखाना, या तीनच ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहे. शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक असल्याने शहरातील शिवाजीनगर भागात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या नागरी आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण सुरू करावे, अशी मागणी करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यामार्फत आरोग्य प्रशासनाशी पाठपुरावा करण्यात आला.
तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आज शिवाजीनगर नागरी आरोग्य केंद्रात कोविड 19 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी निळकंठ चाटे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे व विष्णू मुंडे, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. येणाऱ्या काळात या आरोग्य केंद्रात लसीचा पुरवठा व लस देण्यासाठी नागरिकांची गैरसोय होणार नाही, याकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, असे निळकंठ चाटे यांनी यावेळी सांगितले. शिवाजीनगर नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू झाल्याने नागसेन नगर, शिवाजीनगर, इराणी वस्ती आदी भागांतील नागरिकांना आपल्याच भागात लस उपलब्ध झाल्याने गैरसोय दूर झाली आहे.
हेही वाचा - आष्टीचे भूमिपुत्र किशोर शिंदे यांच्या पथकाने केला १३ नक्षलवाद्यांचा खात्मा