परळी (बीड) - वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावर फेकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनामुळे पीपीई कीट, हातमोजे, मास्कच्या कचऱ्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. यातच आज (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एका वेडसर व्यक्तीने शहरात धुमाकूळ घातला. वापरलेले पीपीई कीट आणि मास्क घालून परळीच्या रस्त्यावर हा वेडा फिरत असल्याचे दिसून आले.
जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक...
परळीच्या कचरा संकलनात रस्त्याच्या कडेला रुग्णालयात वापरण्यात येणारे सुरक्षा उपकरणे फेकल्या जात आहेत. वापरलेले पीपीई कीट, हातमोजे, मास्क यांचा खच रस्त्यावर पडत असल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. पीपीई किटचा कचरा निचरा जिथल्या तिथे झाला पाहिजे. मात्र, हा कचरा रस्त्यावर येत असल्याने कोरोना काळात ही धोकादायक बाब आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जैविक कचऱ्याची विल्हेवाट प्रशासनाने नेमून दिलेल्या निर्देशांप्रमाणे लावणे बंधनकारक आहे. घातक कचरा उघड्यावर फेकणे गुन्हा आहे. यामुळे याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा - कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन
वेडसर व्यक्तीने घातले पीपीई कीट -
दरम्यान, आज सायंकाळी तर धडकी भरवणारा प्रकार समोर आला आहे. वापरलेले पीपीई कीट आणि मास्क एका वेडसर व्यक्तीच्या हाती लागले. यानंतर हे पीपीई कीट घालून तो परळीच्या रस्त्यावर फिरताना दिसून आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये धडकी भरली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वस्तरातून होणारे प्रयत्न लक्षात घेता हा प्रकार धक्कादायक आहे. दुर्देवाने असाच एखादा व्यक्ती 'सुपरस्प्रेडर' बनुन धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी संबधित अधिकारी यांच्याशी दुरध्वनीव्दारे संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.