बीड Anil Jagtap will join Shinde Faction : दोन महिन्यापूर्वी बीड जिल्हाप्रमुख पदावरुन हटवत अनिल जगताप यांना जिल्हा सहसंपर्क प्रमुख पदावर नियुक्ती देण्यात आली. या निवडीनंतर जगताप यांच्या समर्थकांनी आपल्या पदाचे राजीनामे देत संताप व्यक्त केला. मात्र, अनिल जगताप यांनी पक्षानं घेतलेल्या निर्णयाबाबत काहीही भूमिका स्पष्ट केली नाही. परंतु, शुक्रवारी (5 जानेवारी) बीड इथं पत्रकार परिषद घेऊन जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
अंधारात जाणारी सेना : आपण गेली चाळीस वर्षापासून निष्ठेने ज्या पक्षात काम करतो, त्या पक्षात आपल्यावर वारंवार अन्याय होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. "1986 पासून शिवसेनेत काम केलं, बाळासाहेबांचे विचार तळागाळात पोहचवले. शिवसेनेत जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मिळाली. त्यामध्ये विधानसभा जवळ आली, की माझ्यावर कायम अन्याय होतो. हे एकदा नाही दोन-तीन वेळा घडलंय. परंतु, हे कशामुळं घडतय याचं उत्तर काही मला मिळालं नाही. तसंच, कुणाचं ऐकून असं केलं जाते हेही कळत नाही. त्यामुळं आता जी सेना अंधारात जात आहे, त्यांना आमचा अखेरचा जय महाराष्ट्र" म्हणत जगताप यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला. जगताप यांनी "35 सरपंच, अनेक पदाधिकारी 9 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत" असंही जाहीर केलय.
जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी मिळणार? : शिवसेनेत फुट पडल्यानंतरच बरेच प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाचं काय होईल, अशी चर्चा होती. त्यातच अनिल जगताप नाराज असल्याचं चित्र होतं. त्यावेळी अनिल जगताप यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यांची मनधरणी केल्यानं हा निर्णय जगताप यांनी मागं घेतला. मात्र, आज पुन्हा तोच निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. आता शिंदे गटात त्यांना कोणती जबाबदारी मिळणार? जिल्हा प्रमुखपदी निवड होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
हेही वाचा :
1 गँगस्टर शरद मोहोळचा दिवसाढवळ्या गेम; लग्नाच्या वाढदिवसालाच भयावह शेवट
2 शरद पवारांनी नाट्य संमेलनात पक्षविरहित राजकारण केलं - मंत्री उदय सामंत
3 अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपा आमदाराची दादागिरी, सुनील कांबळेंची पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण