बीड - अपघातातील गंभीर जखमी तरुण तडफडत असतानाही उपस्थित डॉक्टरांनी उपचार न केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही घटना बीड जिल्हा रुग्णालयात घडली आहे. त्यानंतर या दोन्ही जखमी तरुणाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गणेश देशमुख आणि सचिन भोसले असे मृतांची नावे असून हे दोघेही माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील रहिवासी आहेत.
कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर जीप आणि दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातातील दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या तरुणावर नजीकच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र या तरुणावर कसलाच उपचार झाला नाही. शिवाय जखमींना बेडवर नाही, तर चक्क जमिनीवर झोपू घातले. दोन्ही रुग्ण अक्षरशा तडफडत होते. तरी देखील एकही डॉक्टर किंवा कर्मचारी या रुग्णांच्या मदतीला धावून आला नाही. रुग्ण तडफडत असतानाचा हा व्हिडिओ सोशल माध्यमावर चांगलाच वायरल होत आहे. दोघांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात डॉक्टर दोषी असतील तर कारवाई केली जाईल. त्याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी दिली आहे.