बीड - जिल्ह्यात शनिवारी दोन रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. शनिवारपर्यंत बीड जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण नव्हता. मात्र, दोन रूग्ण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. माजलगाव आणि गेवराई या दोन तालुक्यातील हे रूग्ण असून एका रुग्णाचे वय बारा वर्ष तर दुसऱ्याचे वय 29 वर्ष आहे. हे रूग्ण मुंबईवरून आलेले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.
यापूर्वी 8 एप्रिल रोजी आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे एक कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्या रुग्णावर अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. तो रुग्ण बरा देखील झाला आहे. त्यानंतर मात्र, बीड जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रूग्ण नव्हता. मात्र शनिवारी पुन्हा दोनजण पॉझिटिव्ह आढळून आले.
आत्तापर्यंत बीड जिल्ह्यात एकूण 402 व्यक्तींची कोरोना चाचणी झाली आहे. यामध्ये दोन रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुंबई-पुणे येथून छुप्या मार्गाने येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.