बीड- अंबाजोगाई तालुक्यामधल्या धानोरा परिसरातील एका खदानीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. हे दोन्ही मुले धानोरा जवळील आपेगावचे रहिवाशी होते. त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आहे.
अनिकेत सत्यप्रेम आचार्य (वय १५) आणि रोहन रमेश गायकवाड (वय १५,) अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, शनिवारी दोघेही आपेगाव पासून जवळच असलेल्या धानोरा शिवारातील खदानीमध्ये मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यांच्याबरोबर आणखी एक जण होता. मासे पकडत असताना पाय घसरल्यामुळे अनिकेत व रोहन पाण्यात पडले, दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या तिसऱ्या मुलाने आरडा ओरड केली. मात्र त्यालाही पोहता येत नसल्यामुळे तो त्या दोघांचे प्राण वाचू शकला नाही. त्याची आरडाओरड ऐकून परिसरातील लोक धावत आले. मात्र तोपर्यंत दोघेही बुडाले होते. अंबाजोगाई पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, त्या दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. अनिकेत व रोहन हे दोघे दहावीचा वर्गात शिकत होते. त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी आपेगावामध्ये कळताच गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - मेट्रो कारशेडच्या नावाने भाजपने मुंबईकरांना फसवले - सचिन सावंत
हेही वाचा - बोरीवलीत सामाजिक कार्यकर्त्याचे अपहरण, कळवा खाडी पुलावरून फेकले; दोघांना अटक