बीड - शहरात एका 22 वर्षीय मुस्लीम महिलेला तिच्या पतीने तलाक...तलाक... तलाक असे म्हणत घटस्टफोट दिल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी संबंधित महिलेने पोलिसात धाव घेतली आहे. याप्रकरणी शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्यात मुस्लीम विवाह हक्क संरक्षण कायद्यानुसार पती, सासू व नणंदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोमिन अब्दुल करीम मोमिन अब्दुल खालेद असे पतीचे नाव असून मोमीन सना भ्रतार मोमीन अब्दुल करीम (वय २२) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. मुस्लीम विवाह हक्क संरक्षण कायदा लागू झाल्यानंतर बीड जिल्ह्यातला तीन तलाकचा हा पहिलाच गुन्हा आहे.
याप्रकरणी पती मोमिन अब्दुल करीम मोमिन अब्दुल खालेद, सासू फरीदा बेगम अब्दुल खालेद मोमिन, नणंद तबस्सुम भ्रतार मुजम्मिल मोमीन या तीन जणांविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एफआयआरमध्ये म्हटल्यानुसार, नवऱ्याने फिर्यादी पत्नीला माहेरून स्टेशनरी टाकण्यासाठी 3 लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावला होता. फिर्यादी पत्नीच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती नवऱ्याला 3 लाख रुपये देऊ शकत नव्हती. याप्रकरणी पतीने फिर्यादीला अनेकवेळा जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली होती. तर, माहेरहून पैसे आणत नसल्याचा राग मनात धरून तीन वेळा तलाक म्हणत, मोबीन अब्दुल याने पत्नी मोमिन सनाला घटस्फोट दिला. या प्रकरणी पत्नी मोमीन सना हिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात सासू फरीदा बेगम अब्दुल खालिक मोमीन व नणंद तब्बसूम भ्रतार मुजम्मिल या दोघींविरोधात अब्दुल याला तलाक देण्यास भडकवले असल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक पठान हे अधिक तपास करत आहेत.