बीड - तालुक्यातील पालवन येथील वनराई डोंगरावर 13 ते 14 फेब्रुवारीला वृक्ष संमेलन होत आहे. या वृक्ष संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कोणतीही व्यक्ती असणार नाही. तर चक्क एका वडाच्या झाडाला वृक्ष संमेलनाचे अध्यक्षपद दिले असल्याची माहिती पर्यावरण प्रेमी, अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली. बुधवारी शिंदे हे बीड येथे आले असता त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
पूर्वी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वडाची झाडे होती. मात्र विकासाच्या नावाखाली ती वडाची झाडे कापली गेली. त्यामुळे या संमेलनाचे अध्यक्षपद आपण वडाच्या झाडाला दिले आहे, असे सयाजी शिंदे यावेळी म्हणाले.
हेही वाचा... "सध्या भारतात फक्त ‘मोदी’ लिपी दिसते"
आजवर महाराष्ट्रात अनेक संमेलन झाले. त्यातील संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी झालेले वाद देखील पाहिले आहेत. मात्र, बीडमध्ये होत असलेल्या अनोख्या वृक्ष संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी वाद होणार नाही. कारण पालवन येथील डोंगरावर होत असलेल्या या वृक्ष संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वडाचे झाड राहणार आहे, अशी माहिती सयाजी शिंदे यांनी दिली.
हेही वाचा... 'त्या' बाळांना निर्दयीपणे उघड्यावर टाकणाऱ्या मातापित्यांचा लागला शोध
हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील एकमेव अनोखा उपक्रम असणार आहे. संमेलनादरम्यान 50 हून अधिक झाडांच्या रोपांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. मागील अनेक वर्षांपासून पर्यावरण प्रेमींनी एकत्र येत बीड तालुक्यातील पालवणजवळील वनराई डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास टाळण्याच्या संबंधी जनजागृतीची आवश्यकता आहे .याच उद्देशाने बीडमध्ये 13 ते 14 फेब्रुवारीला वृक्ष संमेलन होत आहे.
हेही वाचा... विकृतीचा कळस! चंद्रपुरात तरुणावर 14 जणांचा अनैसर्गिक अत्याचार, तरुणाची आत्महत्या
बीडच्या या वृक्ष संमेलनाचे अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतात कुठेही नाही असे जीवित झाडांचे संग्रहालय पालवण परिसरातील वनराईच्या डोंगरावर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती देखील सयाजी शिंदे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी औरंगाबाद विभागाचे उपायुक्त शिवानंद टाकसाळे कृषिभूषण शिवराम घोडके यांची उपस्थिती होती.