बीड - बीड शहरात मागील वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून सिग्नल बंद असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मुख्य रस्त्यांवरील सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. शिवाय छोटे-मोठे अपघात देखील वाढले आहे. याकडे बीड नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शहरातील नागरिक करत आहेत.
हेही वाचा - शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करा; पूजा चव्हाण वडिलांची मागणी
बीड शहरात दिवसेंदिवस वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बीड शहरातील बसस्थानक परिसर, अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर रोड या परिसरांत तीन-चार वर्षांपूर्वी नगरपालिकेने सिग्नल बसवले होते. मात्र, वर्ष-दीड वर्षातच हे सिग्नल बंद पडले. त्यानंतर बंद पडलेले सिग्नल सुरूच झाले नाहीत. सिग्नल बंद असल्याने वाहतुकीला शिस्त राहिलेली नाही. अनेक वेळा छोटे-मोठे अपघात मुख्य रस्त्यांवर होत आहेत. सिग्नल सुरू करण्याबाबत नगरपालिका प्रशासनात उदासीनता दिसून येत आहे. अनेक वेळा सिग्नल दुरुस्तीची मागणी पुढे आलेली आहे, परंतु हा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे बीडकरांना वाहन कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
वाहन कोंडीमुळे वेळ जातो वाया
सकाळी आठ ते दहा वाजेच्या दरम्यान बीड शहरातील सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. परिणामी ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांना वेळेवर पोहचणे अवघड होते. या शिवाय वाहतूक पोलिसांवर देखील अधिक ताण येतो. यामुळे, बीड पालिकेने याकडे लक्ष देऊन तत्काळ शहरातील सिग्नल सुरू करावेत, अशी मागणी समोर येऊ लागली आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, कुठलीच माहिती देण्यास प्रशासन तयार नसल्याचे दिसून आले.
हेही वाचा - बीड: 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक संचालकाला रंगेहाथ पकडलं