बीड - परळी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी व्यापारी महासंघ पुढे सरसावला आहे. आज शहरातील मेडिकल दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. या एका दिवसाच्या लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. बंदमुळे शहरात दिवसभर शुकशुकाट आहे.
परळीतील व्यापारी महासंघाच्यावतीने आज(१३सप्टेंबर) शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा बंद फक्त एकाच दिवसाचा असून शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपापली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन व्यापारी महासंघाच्यावतीने करण्यात आले होते. या आवाहनाला व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. एक दिवस पूर्ण व्यापार बंद ठेवल्याने कोरोनाची साखळी तोडण्यास काही प्रमाणात प्रशासनाला सहकार्य होईल, असे व्यापारी नंदू सेठ बियाणी म्हणाले. हा बंद यशस्वी होण्यासाठी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड, सचिव नंदु सेठ बियाणी, सदस्य बंडू गरूड, संदिप सेठ लोहोटी, रिषभचंद कांकरिया यांनी परिश्रम घेतले.