बीड - थंडी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी आदी लक्षणे असताना देखील जवळच्याच एखाद्या खागी दवाखान्यात बहुतांश नागरिक उपचार घेत आहेत. एवढेच नाही तर खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने घरातच राहून आजार कमी करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात लोक करत आहेत. हा प्रकार थांबवण्यासाठी आता खासगी रुग्णालयात तपासणीसाठी जाणाऱ्या रुग्णांचीदेखील कोरोनाचाचणी करण्याचे आदेश बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी शुक्रवारी दिले आहेत. विशेष म्हणजे चाचणीसाठी लागणारी पीपीई किट संबंधित रुग्णालयाने उपलब्ध करणे बंधनकारक केले आहे.
चाचणीसाठी सॅम्पल घेण्याची व्यवस्था
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रसार रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी आदेश काढला आहे. आदेशात म्हटले आहे, की खासगी नर्सिंग होममध्ये दाखल रुग्णांची यापुढे कोरोनाचाचणी करणे बंधनकारक आहे. बीड शहरात ज्या खासगी रुग्णालयाची क्षमता 20 बेड्सपेक्षा अधिक आहे, त्या रुग्णालयात कोविड चाचणीसाठी सॅम्पल घेण्याची व्यवस्था जिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नव्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात एक समिती स्थापन करून नोडेल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे खासगी रूग्णालयात अथवा घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांना ब्रेक लागेल व जास्तीत जास्त लक्षणे असलेले नागरिक कोरोनाचाचणी करून घेतील. हा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. आज घडीला बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 5 टक्क्यांवरून 15 टक्क्यावर गेलेला आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे.
'अंमलबजावणी महत्त्वाची'
खासगी रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी लागणारा खर्च अर्थात पीपीई किट खासगी रूग्णालयाला खरेदी करावयाची आहे. जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या या आदेशाची अंमलबजावणी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक कशी करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नोडेल ऑफिसरची नियुक्ती
बीड जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक यांनी खासगी दवाखान्यातील रुग्णांची कोविड चाचणी सनियंत्रण करण्याकरिता एक नोडल ऑफिसरची नियुक्ती करावी, असे आदेश जगताप यांनी दिले आहेत.