बीड - जिल्ह्यात आजघडीला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 56 वर पोहोचलेली आहे. लॉकडाऊन तीनपर्यंत बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्य होती. मात्र, त्यानंतर मुंबई-पुणे येथून येणाऱ्या नागरिकांची संख्या बीड जिल्ह्यात वाढली. व त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडायला लागली. आजघडीला बीड जिल्ह्यात 56 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 30 रुग्ण बरे झाले असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. एकंदरीत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याने बीडकरांना दिलासा मिळत आहे. तर, आजघडीला 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत.
बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. याशिवाय मोलमजुरीसाठी पुणे-मुंबई येथे स्थलांतर करणाऱ्या मजुरांची संख्याही येथे प्रचंड मोठी आहे. याचाच परिणाम तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये पहावयास मिळाला. मुंबई- पुणे येथून मोठ्या प्रमाणात नागरिक बीड जिल्ह्यात परत आले. लॉकडाऊन दोन संपून तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये प्रवेश करत असताना बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्य होती. मात्र, त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले. तोपर्यंत जिल्हा प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरण थांबवून होम क्वारंटाईनची पॉलिसी अवलंबली होती.
आजघडीला बीड जिल्ह्यात 56 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 30 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून आपापले व्यवहार केले तर बीड जिल्हा कोरोनामुक्त होण्यास प्रशासनाला मोठी मदत होऊ शकते, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी म्हटले आहे.
तालुकानिहाय बरे झालेल्या रुग्णांची संख्या खालीलप्रमाणे -
बीड जिल्ह्यातील 56 पैकी 30 रुग्ण बरे झालेले आहेत. त्यामध्ये बीड तालुक्यातील 5, आष्टी तालुक्यातील 1, पाटोदा 3, गेवराई 2, माजलगाव 12, वडवणी 1, धारूर 4 तर केज येथील 2 अशी संख्या आहे.