बीड - परळी थर्मल विजनिर्मितीसाठी खडकत धरणात जायकवाडीचे पाणी सोडण्यात आले आहे. परळी थर्मलमध्ये पुन्हा नव्याने वीज निर्मिती करण्यासाठी चाचपणी करण्यात आली. गुरुवार पासून नियमित वीज निर्मिती करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. परळी वद्युत निर्मिती केंद्र नव्याने सुरू होत असल्याने सुरुवातीला साडेतीन हजार कामगारांना काम मिळू शकते. मागील सहा-सात महिन्यापासून परळी येथील औष्णिक विद्युत केंद्र पाण्याअभावी बंद होते.
दीड वर्षापासून बीड जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही तर मग वीज निर्मितीसाठी पाणी कुठून येणार. पाण्याअभावी मागील सहा-सात महिन्यापासून बीड जिल्ह्यातील परळी येथील वीज निर्मिती केंद्र बंद होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी पैठण येथील जायकवाडी धरणातील पाणी कालव्याद्वारे बीड जिल्ह्यात सोडले आहे. ते पाणी माजलगाव येथील बॅकवॉटर व परळी जवळील खडकत धरणात साठवले साठवण्यात आले. खडकत धरणात असलेले पाणी वीज निर्मितीसाठी परळी येथील नवीन औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रा साठी वापरले जात आहे.
अशी आहे सद्यस्थिती -
दुष्काळी परिस्थिती असल्याने सहा-सात महिन्यापासून वीज निर्मिती केंद्रामधील संच क्रमांक सहा-सात आणि आठ पाण्याअभावी बंद ठेवण्यात आले होते. या तीन संचाची एकूण क्षमता 750 मेगावॉट एवढी आहे. याशिवाय तीन, चार व पाच क्रमांकाचे तीन संच मागील पाच वर्षापासून बंद आहेत. 60 मेगावॉटचे संच क्रमांक एक व दोन हे आयुर्मान संपल्याने कायमचे बंद आहेत. परळीतील संच बंद असल्यामुळे पाच हजार कामगार व कंत्राटदारांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. कामगार स्थलांतरित झाले आहेत. अनेक अधिकारीही बदलून गेले आहेत. मात्र, खडकत धरणात जायकवाडीचे पाणी आले असल्याने थर्मल सुरू होऊन परळी शहरात पुन्हा नव्याने उद्योग मिळतील, अशी आशा आहे.