बीड - जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात दिंद्रुड येथील बीड-परळी महामार्गालगत स्वागत बिअरबारमध्ये चोरीची घटना सोमवारी रात्री घडली. चोरट्यानी 90 हजारांची रोखड व सव्वालाखाची विदेशी दारू पळवली. चोरी केल्यानंतर बिअरबारच्या आवारातच तर्र दारू पिऊन दारूच्या अर्धवट बाटल्या तिथेच टाकून चोर पसार झाले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असुन दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे, की दिंद्रुड येथिल कैलास ठोंबरे यांच्या स्वागत बिअरबारमध्ये सोमवारी मध्यरात्री बारच्या पाठीमागून तीन चोरट्यांनी आत प्रवेश केला. दर्शनी भागातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून चायनल गेट व दरवाजाचे कुलुप तोडून चोरटे बारमध्ये घुसले. आदल्या दिवशी रविवारी दिंद्रुडचा बाजार असल्याने जवळपास ९० हजार रुपयांची रोकड गल्ल्यात साचलेली होती. चोरट्यांनी हातोड्याने गल्ला तोडत सर्व ९० हजार रक्कम व दुकानातील १ लाख वीस हजारांच्या विदेशी दारुच्या बाटल्या एका पोत्यात भरल्या व तेथून ते पसार झाले.
टिव्हीचे दोन डिस्प्ले या चोरट्यांनी चोरले खरे पन मद्यधुंद अवस्थेत ते त्यांच्याकडून फुटल्याने टीव्ही डिस्प्ले रस्त्यावर टाकत त्यांनी पलायन केले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दिंद्रुड पोलिसांना घटनेची माहिती समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. बीड येथील अंगुलीमुद्रा पथक व श्वान पथकाने घटनास्थळाला भेट देत तपासणी केली. दरम्यान बारचे व्यवस्थापक बप्पाजी कटारे यांच्या फिर्यादीवरुन दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे