परळी वैजनाथ (बीड) - गेल्या वर्षभरापासून ज्या विषाणूने संपूर्ण जगाला संकटात टाकले आहे, त्या विषाणूवरील लसीकरणाला देशभरात सुरुवात करण्यात आली. येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुरमे यांनी पहिली लस घेऊन सुरुवात केली.
डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना देण्यात येणार लस
जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाला देशात शनिवारी (ता.१६) सुरुवात झाली. या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुरमे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. वैभव डुबे यांनी स्वतः लस घेऊन शनिवारी सकाळी १०.४०च्या सुमारास सुरुवात करण्यात आली.
तालुक्यातील १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस
पहिली लस परिचारिका वनश्री जाते धव यांनी दिली. तालुक्यातील १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या दिवशी लस देण्यात येणार आहे. येथील लसीकरण मोहिमेत डॉ. संजय गित्ते, डॉ. अर्शद शेख, शिक्षक ए. झेड. शेख, परिचारिका वनश्री जाधव, एच. जी. सय्यद, मंगल गित्ते, ज्योती जगतकर, निता मगरे, श्रीमती सिराम आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.
'कोणताही त्रास झाला नाही'
पहिली लस घेतल्यानंतर डॉ. कुरमे यांनी सांगितले, की मी तालुक्यातील पहिली लस घेतली मला कोणताही त्रास झाला नाही. सर्व कर्मचाऱ्यांनी ही लस घ्यावी. घाबरून जावू नये. तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी सांगितले, की कोरोना प्रतिबंधक लस मी घेतली मला कोणताही त्रास झाला नाही. तालुक्यातील सर्व सरकारी, खासगी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी ही लस घ्यावी, यामध्ये कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत.