बीड- रस्ता मजबुतीकरण कामाची मोजमाप पुस्तिका (एमबी) देण्यासाठी गुत्तेदाराकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज सायंकाळी बार्शी नाका परिसरात करण्यात आली.
दरम्यान, भ्रष्टाचार रोखण्यासाठी सुरू असलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहातच जिल्हा परिषदेतील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. वशिष्ट मसू तावरे (वय ५२) असे लाच घेणाऱ्या शाखा अभियंत्याचे नाव आहे. तो जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग क्र. २ मध्ये कार्यरत आहे. डोंगरी विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात रस्ता मजबुतीकरण कामे मंजूर आहेत. केज तालुक्यातील घाटेवाडी येथे तक्रारदाराच्या मजूर संस्थेने ९ लाख रुपयांची रस्ता मजबुतीकरणाची कामे केली आहेत. त्याचे देयक मंजूर व्हावे, यासाठी गुत्तेदाराला शाखा अभियंता वशिष्ट तावरे याच्याकडून मोजमाप पुस्तिका हवी होती. मोजमाप पुस्तिका देण्यासाठी वशिष्ट तावरे याने २७ ऑक्टोबर रोजी गुत्तेदाराला ३ टक्क्यांप्रमाणे २७ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते.
गुत्तेदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करून आज सापळा लावण्यात आला. या सापळ्यात वशिष्ट तावरे अलगद अडकला. मूळचा पाली (ता. बीड) येथील रहिवासी असलेला वशिष्ट तावरेचा एकनाथ नगरात आलिशान बंगला आहे. तेथे 'एसीबी' पथकाने झाडाझडती घेतली. वशिष्ट तावरेवर पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली आहे. उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, निरीक्षक राजकुमार पाडवी, अमोल बागलाने, विजय बरकडे, सखाराम घोलप, हनुमंत घोलप यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा- महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल