बीड - कोरोनाच्या या बिकट काळात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सायकलिंग सुरू केली. हळूहळू सायकलिंगची गोडी निर्माण झाली, व 12 तासात तब्बल 260 किलोमीटरचा पल्ला गाठला. ही किमया करून दाखवली आहे, बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी, त्यांच्या या अनोख्या विक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
12 तासांत 260 किलोमीटरचा प्रवास
वयाच्या चाळिशीनंतर अनेक व्याधी माणसाला जडू शकतात. मात्र जर आरोग्य तंदुरुस्त ठेवायचं असेल तर व्यायाम महत्त्वाचा आहे. मध्यंतरी कोरोनाच्या काळात पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांनी हळूहळू सायकलिंग सुरू केली. त्यानंतर त्यांना सायकलिंगचा छंद जडला, त्यांनी आपल्या वाढदिवशी तब्बल 12 तासात 260 किलोमीटरचा प्रवास सायकलवर केला आहे. साईनाथ ठोंबरे यांचे वय 52 वर्षांचे आहे. धुळे सोलापुर महामार्गावर रात्री नऊ ते सकाळी नऊ यादरम्यान त्यांनी सायकलिंग केली. याचदरम्यान त्यांनी आपला वाढदिवस देखील साजरा केला. या उपक्रमाला मित्रांची साथ मिळाल्याची प्रतिक्रिया साईनाथ ठोंबरे यांनी दिली.
हेही वाचा -घड्याळप्रेमी शिक्षकाने जमा केले ४०० पेक्षा जास्त घड्याळे