बीड - यंदा बीड जिल्ह्यात फारशी पाणीटंचाई जाणवत नसली तरी, वाढत्या तापमानाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. बीड शहरात ठिकठिकाणी थंड पेयाची दुकाने थाटलेली पाहावयास मिळत आहेत. शनिवारी बीड जिल्ह्यात 38 डिग्री सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी नागरिक गमजा (पंचा), टोपी, अथवा छत्रीचा आधार घेत आहेत. वाढत्या तापमानाचा परिणाम थंड पेयाच्या दुकानांवर नागरिक गर्दी करत असल्याचेही चित्र बीड शहर व परिसरात पाहायला मिळत आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ द्यायचे नसेल तर, रसभरीत फळांचा आहारामध्ये अधिक वापर करा, असा सल्ला डॉ. हनुमंत पारखे यांनी दिला आहे.
सध्या ऊन चांगलेच तापू लागल्यामुळे नागरिक सकाळी 11 वाजेपर्यंत आपली कामे उरकून घरात बसणे पसंत करत आहेत. याचा परिणाम बीड शहरातील मुख्य बाजारपेठ च्या ठिकाणी रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सायंकाळी पाच वाजल्यानंतर बाजारपेठेत गर्दी व्हायला सुरुवात होते. तीव्र उन्हामध्ये लोक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. सध्या अगोदरच कोरोनाची बिकट परिस्थिती आहे. अशा स्थितीत आजारी पडल्यास अधिक त्रास होऊ शकतो, हे लक्षात घेऊन नागरिक काळजी घेत आहेत.
फ्रिज-कुलरच्या विक्री व दुरुस्तीमध्ये वाढ
यंदा उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होताच कुलर, फॅन, तसेच एसी च्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. याशिवाय कुलर फॅन दुरुस्तीसाठी देखील मोठ्या प्रमाणात येत असल्याचे व्यापारी राजेभाऊ ईनकर यांनी सांगितले.
शरीरातील पाणी टिकवून ठेवा
उन्हाळ्याचे अजून अडीच महिने बाकी आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळा कडक आहे. तीव्र उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी कमी होण्याची शक्यता दाट असते. अशावेळी नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगत डॉ. हनुमंत पारखे म्हणाले की, नागरिकांनी आपल्या आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात रसभरीत फळे खाणे तसेच, सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेमध्ये उन्हात फिरण्याचे टाळणे, अथवा उन्हापासून संरक्षण होईल याची काळजी घेणे, आवश्यक असल्याचेही डॉ. पारखे यांनी सांगितले आहे.