बीड- जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथे नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने विनयभंग केला. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरुन चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भागवत राऊत (व.४०) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
१२ ऑगस्ट रोजी चकलांबा ठाणे हद्दीतील एका गावात ही घटना घडली. खासगी शिकवणी घेणारा शिक्षक भागवत राऊत (व.४०, रा. उमापूर, ता. गेवराई) याने पीडित १५ वर्षीय विद्यार्थिनीला बोलावले. शिकवणीच्या निमित्ताने त्याने विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केले. या घटनेनंतर तिने घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर मंगळवारी रात्री पीडितेसह तिचे नातेवाईक चकलांबा पोलीस ठाण्यात पोहोचले.
पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी शिक्षकावर विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबधंक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. दरम्यान, विद्यार्थिनीच्या पालकांनी सदरील शिक्षकास चांगलाच चोप दिला होता. त्यानंतर पालकांनी शिक्षकाला ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते.