बीड - जिल्ह्यातील तलाठी भरतीचा गोंधळ थांबायचं नाव घेत नाही. बाहेर जिल्ह्यांतून आलेल्या पात्र उमेदवारांची यामुळे ससेहोलपट होतेय. कोरोनाच्या संकटात नोकर भरतीसाठी जीव धोक्यात घालून सेवेत रुजू होण्यासाठी आलेल्या तब्बल 50 जणांना महसूल प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दीड वर्षांपासून तलाठी भरतीची प्रक्रिया रखडली आहे. यात इतर जिल्ह्यांतील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाल्या असून सेवत रुजू देखील करण्यात आले आहे. मात्र बीड जिल्ह्यातील उमेदवारांना कोरोनाचे कारण देऊन रुजू होता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
यामुळं या पात्र उमेदवारांनी थेट मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांना निवेदन देत विनंती केली. नोकर भरतीमधील भेदभाव आणि गोंधळ थांबवून आम्हाला न्याय द्या, अशी मागणी केली. बीड जिल्हाधिकारी कार्यलयात रुजू होण्यासाठी यवतमाळ, कोल्हापूर, सांगली, ठाणे, नागपूर वरून पात्र तरुण-तरुणी 15 दिवसांपासून कार्यलयात फेऱ्या मारत आहेत. या कारभाराबद्दल पात्र उमेदवार सीमा नांगरे(जालना), किमया पांडे(कोल्हापूर) व अमित तरवारे(यवतमाळ) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केल्यानंतर 31 जुलैच्या शासन निर्णयामुळे नवीन पदस्थापनेला तूर्तास स्थगिती देण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे रुजू करून घेता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले आहे.