बीड - महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेमध्ये मुलींचा 94.36 टक्के तर मुलांचा 88. 94 टक्के निकाल लागला आहे. यात बीड जिल्ह्याचा दहावीचा निकाल हा 91.24 टक्के लागला आहे. यात आष्टीच्या स्वप्निल कोकणे या विद्यार्थ्याने 95.20 टक्के गुण घेत घवघवीत यश मिळवले आहे.
बीड जिल्ह्यातून एकूण 42 हजार 788 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते. यापैकी 39 हजार 40 विद्यार्थी पास झाले असून 11023 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यामध्ये 18 हजार 176 मुलींपैकी 17 हजार 150 मुली पास झाल्या आहेत. तर 24 हजार 662 मुलांपैकी 21 हजार 890 मुल पास झाली आहेत. बीड जिल्ह्याचा दहावी परीक्षेचा एकूण निकाल 91.24 टक्के एवढा लागला आहे.
आष्टीच्या स्वप्निलचे यश-
दहावी बोर्डाच्या परीक्षेत बीड जिल्ह्यातील आष्टी येथील स्वप्निल चंद्रकांत कोकणे या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. त्याला भविष्यात वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर व्हायचं असून, गरीब रुग्णांची सेवा करायची असल्याचे त्याने सांगितले. स्वप्निल हा आष्टीमधील वसुंधरा शाळेत शिक्षण घेत आहे. त्याच्या या यशामुळे आई वडील खुश आहेत.
दरम्यान, नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ३.१ टक्क्यांनी अधिक आहे.