बीड - महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद येताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विसर पडला आहे. पूर्वीच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना काढून शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. त्याचप्रमाणे या महाविकास आघाडी सरकारनेदेखील नवीन वर्षाच्या कोरड्या शुभेच्छा शेतकऱ्यांना देत फसवणूक केली असल्याचा आरोप करत बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोंबा ठोको आंदोलन करत शासनाच्या शेतकरी कर्जमाफीच्या जीआरची होळी केली आहे.
हेही वाचा - 'मुंबईतील निर्जन स्थळे सुरक्षित करणार'
या सरकारचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी नवीन वर्षानिमित्त शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्या शुभेच्छा कोरड्याच आहेत. पहिल्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव कर्जमाफीला देऊन फसवणूक केली. तसेच ठाकरे सरकारने सातबारा कोरा करू, असे म्हणून महात्मा फुले यांच्या नावाने दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली.
यावेळी गेवराई तहसील कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता. मात्र, हा शब्द पाळलेला नाही. महाविकास आघाडीच्या या सरकारचा खोटारडेपणा शेतकरी खपवून घेणार नाहीत. नवीन वर्षाच्या कोरड्या शुभेच्छा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचा आरोपही आंदोलकांनी यावेळी केला. गेवराई येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या शेतकरी कर्जमाफीच्या जीआरची होळी करून निषेध नोंदवला आहे. यावेळी बीड जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.