बीड- जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन व तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या वतीने 'मुख्यमंत्री साहेब जागे व्हा' च्या घोषणा देत आज आंदोलन केले. तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप पंचनामे करण्यात आले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्या नेतृत्वात गेवराई येथे शेतकऱ्याच्या बांधावरून मुख्यमंत्र्यांना जागे करण्यासाठी "मुख्यमंत्री जागे व्हा" अशा घोषणा देण्यात आल्या.