बीड - पूर्णा-हैदराबाद या पॅसेंजर रेल्वेमध्ये एका डब्यातील शौचालयात १९ वर्षीय तरुणाने तोंडात सुतळी बॉम्ब धरून स्फोट घडवून आणला असल्याची घटना सोमवारी सकाळी सव्वाअकराच्या दरम्यान घडली. यामध्ये सदरील युवक गंभीर जखमी झाला असून ज्या डब्यात त्याने बॉम्ब फोडला त्या डब्याला किरकोळ आग लागली होती. या तरुणाने तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून स्फोट का केला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सय्यद अक्रम (वय १९ वर्ष, राहणार वाघाळा जिल्हा परभणी) असे सुतळी बॉम्बचा स्फोट घडवून आणलेल्या तरुणाचे नाव आहे.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी आहे, की सय्यद अक्रम हा त्याच्या आई व एका भावाबरोबर परळीवरून हैदराबादकडे पूर्णा-हैदराबाद पॅसेंजर रेल्वेमधून निघाला होता. परळी वरून रेल्वे हैदराबादकडे निघाल्यानंतर अवघ्या १० ते १५ मिनिटानंतर अक्रम हा लघुशंकेला म्हणून बोगीतील शौचालयामध्ये गेला. तेथे त्याने तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून पेटवला. त्यानंतर मोठा स्फोट झाल्याने प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. सय्यद अक्रमने तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून का स्फोट घडवून आणला, याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास परळी पोलीस व रेल्वे पोलीस करत आहेत.
हेही वाचा - बीडमधील एसबीआय बँकेच्या मुख्य शाखेला आग; महत्वाची कागदपत्रे जळून खाक
हेही वाचा - भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ बीडमध्ये एबीव्हीपीचे आंदोलन