बीड - ऊसतोड मजुराला मारहाण केलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. ऊस तोडणीच्या कामाला जात नसल्याने मुकादम आणि पोलिसांनी मारहाण केल्याने गेवराई तालुक्यातील एरंडगावच्या एका ऊसतोड मजुराने शुक्रवारी आत्महत्या केली होती. त्याच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडत कारवाईची मागणी केली होती. अखेर शनिवारी या प्रकरणात मजुराला मारहाण केलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले.
हेही वाचा - आमदार मेटेंना घरचा आहेर, अजेंडा नसलेला पक्ष म्हणत अविनाश खोपेंचा राजीनामा
गेवराई तालुक्यातील एरंडगावचा ऊसतोड मजूर आसाराम सखाराम कवठेकर यांच्या आत्महत्येप्रकरणी भाऊ किसन कवठेकर यांच्या तक्रारीवरून मुकादम बाळू उर्फ गणेश दत्ता गिरी, विकास दत्ता गिरी, सचिन दत्ता गिरी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी उद्धव जरे, पोलीस कर्मचारी रेवणनाथ दुधाने व अन्य दोघांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात तत्काळ त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत नातेवाईकांनी शुक्रवारी रात्री बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस कर्मचारी जरे व दुधाने यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
हेही वाचा - बिंदुसरा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केला सत्कार