बीड - पंकजा मुंडे आणि डॉ. प्रितम मुंडे या दोघी बीड जिल्ह्यात रेल्वे आणल्याचे सांगत आहेत. मात्र बीड जिल्ह्यात रेल्वे आणण्याचे श्रेय दिवंगत विमल मुंदडा यांचे असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या तथा लोक तांत्रिक जनता दलाच्या सुशीला मोराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बीड लोकसभा मतदार संघात आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना लोकतांत्रिक जनता दलाने जाहीर पाठिंबा दिल्याचे सुशीला मोराळे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली.
बीडच्या रेल्वेसाठी विमल मुंदडा यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी आमची भेट घडवून आणली होती. तसेच विविध समित्यांचेही गठन करण्यात आले होते. तेव्हा आंदोलने केल्यामुळे अद्यापही काही जणांवर खटले सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
मागच्या ५ वर्षाच्या कार्यकाळात विकासकामे करण्यासाठी बीडच्या खासदार प्रितम मुंडे अपयशी ठरलेल्या आहेत. त्या रेल्वेचे श्रेय घेऊ पाहत आहेत. मला त्यांना सांगायचे आहे, की जेव्हा डॉ. प्रीतम मुंडे यांचा जन्म झाला नव्हता, तेव्हापासून बीडच्या रेल्वेसाठी आम्ही लढा उभारलेला आहे. मग ते गंगाधर आप्पा बुरांडे, केशरकाकू क्षीरसागर या सगळ्यांनी लढा उभारलेला आहे, अशा सगळ्या परिस्थितीत बीडच्या मुंडे भगिनी रेल्वेच्या कामावरून स्वतःची टिमकी मिरवत आहेत. पाच वर्षात १२ किलोमीटरदेखील रेल्वेचे काम पंकजा मुंडे व प्रितम मुंडे यांना करता आले नाही. ही वस्तुस्थिती बीड जिल्ह्यातली जनता जाणते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये प्रितम मुंडे यांचे मोठे अपयश आहे. हेच अपयश झाकण्यासाठी मुंडे भगिनी भावनिक राजकारणाचा आधार घेतात, असा आरोप यावेळी सुशीला मोराळे यांनी केला आहे.
केंद्र स्तरावरदेखील भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले आहेत. पाच वर्षांत मोदींनी गाय, गोबर व मन की बात यापलीकडे काहीच केले नाही, अशा परिस्थितीत या सरकारला जनता धडा शिकवेल. २०१९ ची निवडणूक सर्वसामान्य व्यक्ती हातात घेत असल्याचे चित्र राज्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.