बीड- जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणात खांदेपालट करण्यात आली आहे. गत आठवड्यात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या जागी राजा रामास्वामी नवे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. आता अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.
बीडचे अप्पर अधीक्षक विजय कबाडे यांची नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे बदली झाली असून त्यांच्या जागी नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकादमीत अधीक्षक पदावर असलेले सुनील लांजेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे . याबरोबरच तीन नव्या उपविभागीय पोलीस अधिकायांची देखील या फेरबदलात भर पडणार आहे. बीडच्या उपाधीक्षक पदी संतोष वाळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते मुंबई येथे कार्यरत आहेत. तसेच अंबाजोगाईचे उपाधीक्षक राहुल धस यांची पुणे जिल्ह्यातील दौंड येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर भोकरदन येथे कार्यरत असलेले सुनील जायभाये येणार आहेत . तर माजलगावचे पोलीस उपाधीक्षक श्रीकांत डिसले यांची नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे . कळंब येथे कार्यरत असलेले सुरेश पाटील यांची डिसले यांच्या जागेवर बदली झाली आहे .