बीड : अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथे तीक्ष्ण हत्याराने वार करत निर्घृण खून करण्यात आला आहे. दत्ता गायके (वय 58) असे खून करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. 20 पेक्षा अधिक वार करत निर्घृण खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. तर घटनास्थळी जावयाची मोटारसायकल आढळल्याने जावयानेच खून केल्याचा अंदाज आहे. रामेश्वर गोरे असे जावयाचे नाव आहे.
दुसऱ्या लग्नासाठी परवानगी देत नव्हते सासरे: रामेश्वर गोरे यांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र सात वर्ष झाले तरीही मूलबाळ न झाल्याने तो सासऱ्याकडे दुसऱ्या लग्नासाठी परवानगी मागत होता. मात्र सासरे व इतर कुटुंब त्यांना दुसऱ्या लग्नासाठी परवानगी देत नसल्याने त्याने रागाच्या भरात खून केल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
तीन दिवसांवर मुलाचे लग्न : मयत दत्ता गायके यांना पाच एकर कोरडवाहू जमीन असल्याने ते मोलमजुरी करून उपजीविका भागवत होते. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली होत्या त्या दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे. मुलाचे लग्न दोन तीन दिवसांवर असल्याने मुली आणि जावई हे लग्नासाठी केंद्रेवाडीत आले होते. मात्र रात्री तिक्ष्ण हत्याराने वार करत गायके यांचा खून करण्यात आला आहे. अगदी शांत आणि गरीब स्वभाव मयत गायके यांचा असल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोन दिवसात दोन खून : तर दुसरी घटना धारूरच्या येथे भावाच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे दोन दिवसात दोन खुनाच्या घटना घडल्याने धारूर तालुक्यात नेमका काय चालले आहे, या परिसरात पोलिसांचा धाक आहे की नाही? असाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
हेही वाचा -