बीड- येथील जिल्हा रुग्णालयातून 258 व्यक्तींचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. गुरुवारी 258 पैकी 6 अहवाल पॉझिटिव्ह आले तर 3 अहवाल येणे अद्याप बाकी आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 190 वर पोहोचली आहे. सध्या 68 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गुरुवारी सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बीड शहरातील काळे गल्ली भागातील 1, गेवराईच्या उमापूर भागातील 1, परळीच्या एसबीआय शाखेचा एक कर्मचारी, धारुरच्या अशोकनगर भागातील एक महिला, अंबाजोगाईच्या देशपांडे गल्लीतील एक फेरीवाला व्यावसायिक व सातपुते गल्लीतील एका पुरुषाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा रुग्णालयात गुरुवारी संभाव्य कोरोना रुग्ण म्हणून स्वॅब घेतलेल्या दोघांचा मृत्यू झाला होता. मात्र, या दोघांचेही कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील एका व्यक्तीला डेंग्यू झालेला होता तर, दुसर्याला न्युमोनियाची तक्रार होती. या दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आरोग्य प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.