बीड - अनेक प्रकारचे दुर्मिळ बियाणे जतन न केल्यामुळे संपुष्टात येत आहेत. काही बिया तर अशा आहेत की, त्याची नावे देखील अनेकांना माहीत नाही. जांभळी हळद, काटेरी काकडी, गोड मिरची, असामी लिंबू, काळा वाटाणा, लाल हादगा, कश्मीरी लसून यासारख्या अनेक वाणाच्या बिया आपण कधी पाहिल्या देखील नाहीत. मात्र, बीडच्या श्रुती अरुण ओझा या बीएस्सी झालेल्या तरुणीने सर्व बिया जतन करून ठेवल्या आहेत. देशातील विविध राज्यांमधील अत्यंत दुर्मीळ बियांचे जतन करून त्या बिया नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा अनोखा उपक्रम बीडच्या या बीज कन्येने राबवला असून देशभरात 18 हजाराहून अधिक नागरिकांना तिने या दुर्मीळ बिया पोस्टाने पाठवल्या आहेत.
250 हून अधिक दुर्मीळ जातीची बियाणे -
आपल्याला फक्त हळद माहिती आहे. मात्र, श्रुतीकडे जांभळ्या हळदीचे बियाणे आहे. इतकेच नाहीतर मिरची तिखट असते, हे देखील आपल्याला माहिती आहे. मात्र, श्रुतीकडे गोड मिरची आहे. हे ऐकून आश्चर्च वाटले नाही. पण, हे सत्य आहे. याबरोबरच काटेरी काकडी, काळा वाटाणा, लाल हादगा, काश्मिरी लसून, आसामी लिंबू, पांढरी गुंज, निळी गुंज, लाल मुळा यासारख्या अनेक दुर्मीळ वाणांच्या बिया श्रुतीने अगदी मोठ्या कष्टाने जपून ठेवलेल्या आहेत.
इतरांना उपयोग व्हावा यासाठी भन्नाट आयडिया -
अडीचशे ते तीनशे प्रकारच्या वेगवेगळ्या बियांचा नागरिकांना व शेतकऱ्यांना याचा उपयोग व्हावा, यासाठी श्रुतीने एक भन्नाट आयडिया शोधून काढलीय. पैशांमध्ये बिया विकण्यापेक्षा त्या बिया ज्यांना दिल्या आहेत, त्यांच्याकडे वर्षभरानंतर बिया उपलब्ध झाल्यावर अर्ध्या बिया श्रुती परत घेते. या भन्नाट आयडियामुळे श्रुतीकडील बियांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे.
शासनाच्या मदतीची अपेक्षा -
श्रुती ओझा हिच्या या अनोख्या उपक्रमामुळे दुर्मीळ असलेले बियाणे जतन होत आहेत. मात्र, आमच्याकडे शेती नसल्यामुळे आम्ही ही बियाणे मोठ्या प्रमाणात लावू शकत नाही. या दुर्मीळ बियाण्यांचा वाढीसाठी शासनाकडून अथवा जिल्ह्याच्या कृषी विभागाकडून काही मदत झाली, तर दुर्मीळ बियाणे पुन्हा सहजपणे उपलब्ध होऊ शकतील, अशी अपेक्षा श्रुतीचे वडील अरुण ओझा यांनी व्यक्त केली आहे.