बीड - शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी उपोषण सुरु केले आहे. बीड शहरातील रस्त्याची कामे तात्काळ सुरु करा, या मागणीसाठी हे उपोषण सुरु केले आहे. यावेळी बीडकरांनो उठा, जागे व्हा, किती दिवस त्रास सहन करायचा? अशा घोषणा दिल्या गेल्या.
खराब रस्त्याची जबाबदारी कोणाची ?
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड शहरातील नागरिकांना खराब रस्त्यांचा प्रचंड त्रास होत आहे. मागणी करून देखील याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. परिणामी अनेक दुचाकीस्वार खराब रस्त्यामुळे घसरून पडत आहेत. यापूर्वी शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी रस्त्याची कामे तात्काळ सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यांची तात्काळ कामे सुरु करा, अशा सूचना त्यांनी केल्या होत्या. मात्र अजुनही शहरातील रस्त्यांची कामे सुरू झाली नाहीत. रस्त्यावर पाणी साचून रोगराई वाढली आहे. याला सर्वस्वी नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप शिवसंग्राम पेठ बीड विभागप्रमुख तथा माजी नगरसेवक दत्ता गायकवाड यांनी केला आहे.
यावेळी शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, जेष्ठ नेते लक्ष्मण ढवळे, सरचिटणीस तथा बीड शहर प्रभारी अनिल घुमरे, तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे यांच्या सह पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.