बीड- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी अनेक शक्ती काम करत आहेत. जेवढे महाविकास आघाडी आरक्षण न मिळण्यास जबाबदार आहे. तेवढेच जबाबदार आरएसएस व भाजपही आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी कटकारस्थान केले जात आहेत. असे असताना देखील शिवसंग्राम पक्ष व आमदार विनायक मेटे हे भाजपच्या विरोधात बोलत नाहीत. असे सांगत शिवसंग्रामचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अविनाश खोपे यांनी राजीनामा दिला.
मराठा आरक्षणाबाबत शिवसंग्राम पक्षाची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न पटणारी आहे. म्हणून मी या पुढे केवळ मराठा समाजासाठी काम करत राहणार, असेही खोपे म्हणाले. काल बीड येथे पत्रकार परिषदेत खोपे यांनी ही माहिती दिली. मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाली याला जबाबदार राज्य सरकार आहे. हे जरी सत्य असले, तरी त्याला पूर्ण सत्य म्हणता येणार नाही. कारण राज्य सरकारपेक्षा जास्त जबाबदार भाजप व आरएसएस आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पक्ष बाजूला सोडून समाजासाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेण्याची गरज आहे. मात्र, शिवसंग्राम भाजपच्या अजेंड्यावर चालत आहे. ही बाब आता राज्यातील मराठा समाजातील नागरिकांच्या लक्षात आली आहे. असे अविनाश खोपे म्हणाले.
हेही वाचा- बीड : लग्नाचे आमिष दाखवून आठवीच्या विद्यार्थिनीवर शारीरिक अत्याचार