बीड - शेतकऱ्याच्या ऊसाचा भाव जाहीर केला जात नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरू करू नका, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. याचे निवदेन बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आले.
ऊसाचे दर न ठरवता शेतकऱ्यांकडून ऊस घेऊन जायचा आणि त्यानंतर स्वतःला वाटेल तो भाव शेतकऱ्यांना द्यायचा, अशी फसवणूक याआधी अनेकदा झाली आहे. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - बीड: हुतात्मा परमेश्वर जाधवर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
२०१७ - १८ दरम्यानचे शेतकऱ्यांच्या ऊसाचे फरक बिल अद्याप मिळालेले नाही. यावर्षी देखील बीड जिल्ह्यात ज्या भागात उसाचा पट्टा आहे, त्या भागातील कारखानदार कारखाना सुरू करण्याच्या तयारीत आहेत. पण, अजूनही साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या ऊसाचा भाव जाहीर झालेला नाही. त्यामुळे साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या ऊसाचा भाव जाहीर होत नाही, तोपर्यंत गळीत हंगाम सुरू करू नये, असे शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आले.
हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत कमी - मकरंद अनासपुरे
विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या निर्धारित एफआरपी पेक्षा अधिक २०० रुपये भाव देणे अपेक्षित आहे. यावर्षी ऊसाचे भाव जाहीर न करता ऊसतोडणी केली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.