बीड - शेतकऱ्यांना खरीप हंगामामधील पिकांचा पीकविमा भरण्यासाठी अद्यापपर्यंत कुठल्याही कंपनीने टेंडर भरलेले नाही. यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना पीक संरक्षण विमा मिळणार नसल्याचे चित्र बीड जिल्ह्यात निर्माण झाले आहे. सरकारने तात्काळ विमा कंपनीला टेंडर देऊन शेतकऱ्यांचा पंतप्रधान फसल विमा योजने अंतर्गत चालू खरीप हंगामामधील पीकविमा भरून घ्यावा, अशी मागणी केली. शेतकरी संघर्ष समितीकडून बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकरी नेते गंगाभिषण थावरे यांनी बैलगाडीतून येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
बीड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बीड जिल्हाधिकारी कार्यालय यादरम्यान बैलगाडीमधून जात बीड जिल्हाधिकाऱ्यांना शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी, बीड जिल्ह्यामध्ये पंतप्रधान फसल विमा योजना खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद इत्यादी पिकांचा विमा भरण्यासाठी अद्यापपर्यंत कुठल्याही विमा कंपनीने टेंडर भरलेले नाही. यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे संरक्षण विमा मिळेल की, नाही अशी परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झालेली आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यापैकी महत्वाचे म्हणजे पीकविमा संरक्षण शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. या प्रश्नाकडे एकही लोकप्रतिनिधी अथवा जिल्हा प्रशासन लक्ष देत नसल्याने यंदा विमा कंपनीने बीड जिल्ह्यासाठी टेंडर भरलेले नाही. जर शेतकऱ्यांचा पीकविमा भरून घेतला नाही, तर येणाऱ्या काळात आपत्ती उद्भवली तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. याचा विचार करून शासनाने व प्रशासनाने तात्काळ बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचा पीकविमा भरून घ्यावा, अन्यथा आमचे हे आंदोलन अजून तीव्र करू असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे. येत्या दोन दिवसात जर पीकविमा भरून घ्यायला सुरुवात केली नाही, तर मी दररोज बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.