बीड - सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी सिंचनाची कामे करण्यासाठी जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गढी येथील शारदा प्रतिष्ठान पुढे सरसावले आहे. १ ते १५ मे दरम्यान गेवराई तालुक्यात पन्नास किलोमीटर एवढे नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे कार्यवाह माजी आ. अमरसिंह पंडित यांनी याबद्दल माहिती दिली.
येथे शारदा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजीत ४१ व्या सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. मागील २१ वर्षांपासून शारदा प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा पार पाडला जातो. यामध्ये शेतकरी आणि गोरगरिबांच्या मुला-मुलींची लग्न होतात. शेतकऱ्यांना थोडाफार हातभार लागावा म्हणून या विवाहसोहळ्यांचे आयोजन केले जाते. मात्र, फक्त विवाह सोहळे आयोजित करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यांच्या शेतीसाठीही प्रयत्न करण्यासाठी शारदा प्रतिष्ठान काम करणार असल्याचे प्रतिष्ठानचे कार्यवाह माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी जाहीर केले.
त्यासाठीच प्रतिष्ठानच्या वतीने सिंचनाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यावेळी ५० किलोमीटर अंतराचे नाला खोलीकरण व रुंदीकरण याचे काम झाले पाहिजे, यासाठी शारदा प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागले पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.
शारदा प्रतिष्ठानच्या वतीने यावेली ४१ जोडपे विवाहबंधनात अडकले. जिल्हाभरातील मान्यवर या जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, जयसिंह पंडित यांची उपस्थिती होती.