बीड - घेतलेलं कर्ज फिटलं नाही, शेती पिकली नाही, बँक आणि सावकरांचा तगादा यातून दोन वर्षापूर्वी बबन मस्के यांनी आत्महत्या केली. नवरा सोडून गेला मात्र, डोक्यावर असणारा कर्जाचा डोंगर अद्यापही तसाच आहे. आता चिंगुबाई बबन मस्के (४०) या आपल्या दोन मुलांसह संसाराचा गाडा हाकत आहेत. त्या झगडतायत परिस्थितीशी, कर्जाच्या डोंगराशी आणि सावकारी पाशाशी...
बीड तालुक्यातील पालवन येथील रहिवासी असलेल्या चिंगूबाई बबन मस्के यांचे पती बबन मस्के यांनी २ वर्षापूर्वी विषारी औषध घेऊन स्वतःचं जीवन संपवलं. बबन व चिगूंबाई या दाम्पत्याला दोन मुलं होती. त्यांना तीन एकर जमीन होती. सगळे व्यवस्थित सुरु होते. मात्र, शेतीसाठी बबन यांनी बँकेकडून आणि खासगी सावकाराचे कर्ज घेतले होते. ३ वर्षापूर्वी म्हणजेच 2016 मध्ये बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे बबन मस्के यांनी तेव्हा घेतलेले कर्ज फिटले नाही. बँकेसह खासगी सावकारांचा मोठ्या प्रमाणात कर्ज वसुलीसाठी बबन मस्के यांच्यामागे तगादा होता.
शेतात तर काहीच पिकलं नाही. मग सव्वा लाख ते दीड लाख रुपयांचे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून बबन मस्के यांनी दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात चिगूंबाई मस्के व त्यांची दोन मुलं अक्षय व निखिल उघड्यावर पडली. जेमतेम जमीन तीही दुष्काळामुळे पिकत नाही. अशा परिस्थितीत जगायचं कसं? हा प्रश्न महिला शेतकरी चिंगूबाई मस्के यांच्यासमोर उभा राहिला. जगण्यासाठी त्या धडपड करत आहेत. आपल्या तीन एकर शेतीत खाण्यापुरते पिकवून त्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करत आहे. आता मोठा मुलगा अक्षयला रिक्षा घेऊन दिली आहे. पालवन ते बीड या मार्गावर तो रिक्षा चालवतो तर दुसरा मुलगा निखिल बारावी पास झाला आहे. मात्र पैसे नसल्याने निखिलचे पुढचं शिक्षण थांबले आहे.
कर्जमाफीच्या यादीत नावच नाही
सरकार आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आम्ही आधार देत असल्याचे छातीठोकपणे सांगत आहे. मात्र, पालवनच्या चिंगूबाई मस्के यांना अद्यापही शासनाच्या विधवा पेंशन योजनेचा लाभ मिळाला नाही. कर्जमाफीसाठी चिंगूबाई जेव्हा बँकेत गेल्या तेव्हा त्यांना विचारले की, आमचे कर्जमाफ झाले का? तेव्हा त्यांना बँक कर्मचार्यांनी सांगितले की, तुमचे कर्जमाफीच्या यादीत नावच नाही. हे ऐकून चिंगुबाई मस्के यांच्या पायाखालची जमीन घसरली. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव का आले नाही याचा शोध दोन वर्षापासून चिंगूबाई मस्के घेत आहेत. मात्र, शासनाच्या एकाही कर्मचाऱ्यांनी चिंगूबाई मस्केंच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही.
संसार चालवण्यासाठी चिंगूबाई मस्के यांनी काही हात उसणे व बचत गटाचे पैसे व्याजाने घेतले होते. पुढचे पीक आले की पैसे फेडू असे गणित होते. मात्र, दुष्काळाने या सगळ्या आशा-आकांक्षावर पाणी फेरले आहे. नवऱ्याला आत्महत्या करून स्वतःची सुटका करून घेतली. मात्र, चिंगूबाई आपल्या दोन लेकरांकडे पाहून मोठ्या हिंमतीने लढतायेत परिस्थितीशी.